Raj Thackeray : राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत महिलांना आता पैसे मिळण्यास देखील सुरुवात झाली आहे. मात्र जेव्हापासून या योजनेची घोषणा करण्यात आली तेव्हापासून या योजनेवर विरोधक सातत्याने टीका करत आहेत. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत मोठे भाष्य केले आहे.
या योजनेबाबत चिंता व्यक्त करत राज ठाकरेंनी सरकार कडे यासाठी पैसे कुठे आहेत? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा लाडकी बहिण योजना चर्चेत आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दौरा झाल्यानंतर त्यांनी आज नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. या संवादादरम्यान राज ठाकरेंना लाडकी बहिण योजनेबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी ही योजना किती दिवस चालेल, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
या योजनेबाबत बोलताना पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ एक महिना मिळेल. कदाचित दुसरा महिनाही दिला जाईल. पण, प्रत्येक महिन्यात वाटपासाठी सरकारकडे पैसे कुठे आहेत? अशा योजना चालवायला सरकारकडे पैसे पाहिजे ना. असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.