Nationalist Congress Party : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जम्मू आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि जम्मू-काश्मीरचे प्रभारी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे. श्रीवास्तव म्हणाले की, पक्षाच्या संसदीय मंडळाने पुलवामा जिल्ह्यात निवडणूक लढवण्यासाठी तीन उमेदवारांच्या नावांना मान्यता दिली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने
श्रीवास्तव म्हणाले की, त्रालमधून मोहम्मद युसूफ हझम, पुलवामामधून इश्तियाक अहमद शेख आणि राजपुरातून अरुण कुमार रैना यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. हे सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक लढवत आहे. इतर कोणत्याही पक्षाशी युती न करता पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढवत आहे. म्हणजे महाराष्ट्रात एकत्र सरकार चालवणारे भाजप आणि राष्ट्रवादी जम्मू-काश्मीरमध्ये आमनेसामने दिसणार आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका
जम्मू-काश्मीर विधानसभेच्या 90 जागांसाठी 3 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. याअंतर्गत 18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यात एकूण 24 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. इतर टप्प्यांसाठी उमेदवारांची नावे आणि इतर संबंधित माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असे पक्षाने म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि इतर पक्षांमध्ये कडवी स्पर्धा होणार असल्याचे मानले जात आहे. या राज्यात 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर भाजपने पीडीपीसोबत (People’s Democratic Party) सरकार स्थापन केले.