PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (25 ऑगस्ट) महाराष्ट्र आणि राजस्थानला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11.15 वाजता जळगावात पोहोचतील. आज त्यांच्या उपस्थितीत जळगाव येथे महिला मेळावा होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
पीआयबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान या कार्यक्रमांतर्गत 11 लाख नवीन लखपती दीदींचा सन्मान करणार आहेत. तसेच त्यांना प्रमाणपत्र देतील. याशिवाय यावेळी मोदी 2,500 कोटी रुपयांचा फिरता निधी जारी करतील.
याचा फायदा 4.3 लाख बचत गटांच्या (SHGs) सुमारे 48 लाख सदस्यांना होईल. एवढेच नाही तर पीएम मोदी ५ हजार कोटींचे बँक कर्जही देणार आहेत. याचा लाभ 2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना मिळणार आहे. लखपती दीदी योजनेंतर्गत आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले आहे. सरकारने आगामी काळात ३ कोटी लखपती दीदी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
संध्याकाळी राजस्थानला रवाना
आज पंतप्रधान मोदी राजस्थानलाही भेट देणार आहेत. दुपारी 4.30 वाजता ते जोधपूरला जातील. जिथे ते राजस्थान उच्च न्यायालयाच्या एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मोदी उच्च न्यायालयाच्या संग्रहालयाचे उद्घाटनही करणार आहेत. महाराष्ट्र आणि राजस्थानमधील अनेक सामाजिक आणि न्यायिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा पंतप्रधानांच्या या भेटीचा उद्देश आहे. राजस्थानमध्ये पीएम मोदींव्यतिरिक्त राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे देखील जोधपूरमध्ये असतील.
जोधपूरमध्ये २ तास मुक्काम
वेळापत्रकानुसार पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी ४ वाजता जोधपूर विमानतळावर पोहोचतील. सुमारे दोन तास या कार्यक्रमात राहिल्यानंतर पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होतील. पंतप्रधानांनी त्यांच्या X खात्यावरून याबद्दल पोस्ट देखील केली आहे.