Telegram CEO Pavel Durov Arrested : टेलिग्राम मेसेजिंग ॲपचे संस्थापक आणि सीईओ पावेल ड्युरोव यांना शनिवारी संध्याकाळी पॅरिसमधून अटक करण्यात आली आहे. ड्युरोव यांना बोर्जेट विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ड्युरोव त्यांच्या खासगी जेटने अझरबैजानला जात होते.
पोलीस तपासाचा एक भाग म्हणून अटक वॉरंटनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. या तपासणीत टेलिग्राम कंपनीत मॉडरेटर्स नसल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांचा असा विश्वास आहे की, मॉडरेटरच्या कमतरतेमुळे मेसेजिंग ॲपवर गुन्हेगारी कृत्ये विनाअडथळा सुरू राहू शकतात.
2014 मध्ये रशिया सोडले
दुबईस्थित टेलिग्रामची स्थापना रशियन वंशाच्या ड्युरोव यांनी केली होती. त्यांनी विकलेल्या व्हीके सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विरोधी समुदायांचा आवाज दाबण्यासाठी सरकारी मागण्यांचे पालन करण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी 2014 मध्ये रशिया सोडला.
रशिया, युक्रेन आणि पूर्व सोव्हिएत देशांमध्ये प्रभाव असलेले टेलिग्राम हे फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, टिकटॉक आणि वीचॅट नंतरचे सर्वात प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.
रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित सामग्रीसाठी प्रमुख व्यासपीठ
रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित सामग्रीसाठी टेलिग्राम प्रमुख व्यासपीठ असल्याचे बोलले जात आहे. यावर टेलिग्रामने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. फ्रान्सचे गृह मंत्रालय आणि पोलिसांकडून देखील याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून, युद्धाच्या सभोवतालच्या राजकारणासंदर्भात दोन्ही बाजूंकडून ‘अनफिल्टर्ड सामग्री’साठी टेलिग्राम हे सर्वात प्रमुख व्यासपीठ बनले आहे.
रशिया आणि युक्रेन सरकराचे लोकप्रिय ‘ॲप’
मेसेजिंग ॲप हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी संवादाचे मुख्य माध्यम आहे. क्रेमलिन आणि रशियन सरकार देखील त्यांच्या बातम्या शेअर करण्यासाठी त्याचा वापर करतात. टेलिग्राम हे अशा काही प्लॅटफॉर्मपैकी एक बनले आहे जिथे रशियन युद्धाशी संबंधित सामग्री मिळवता येते.