Bharatiya Janata Party : रांचीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) च्या रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. या प्रकरणी झारखंड भाजप अध्यक्ष बाबुलाल मरांडी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमर कुमार बौरी, केंद्रीय मंत्री संजय सेठ आणि माजी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्यासह 12 हजार 51 बीजेवायएम कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसएसपी चंदन कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दंडाधिकाऱ्यांच्या वक्तव्याच्या आधारे रांचीमधील लालपूर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या लोकांवर लवकरच कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले आहेत.
51 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 12 हजार अनोळखी
लालपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी रुपेश कुमार सिंह यांनी सांगितले की, 51 नामांकित आणि 12 हजार अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रॅलीदरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी शनिवारी सर्व जिल्हा मुख्यालये आणि पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. याच पार्श्ववभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
हजारोंच्या संख्येने असलेले बीजेवायएम कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या, पाण्याच्या तोफांचा आणि रबराच्या गोळ्या झाडल्या. यात अनेक आंदोलक आणि पोलीस जखमी झाल्याचा दावा दोन्ही बाजूंनी केला आहे.