Haryana Election 2024 : हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकीय पक्षांच्या विनंतीवरून मंगळवारी होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. हरियाणात सर्व 90 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला मतदान होणार असून 4 ऑक्टोबरला मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल येणार आहेत.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख बदलण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणात 1 ऑक्टोबरऐवजी 7 किंवा 8 ऑक्टोबरला मतदान होऊ शकते. त्यानुसार मतमोजणीची तारीखही वाढवली जाऊ शकते. निवडणूक आयोग मंगळवारी यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे.
भाजपचे निवडणूक आयोगाला पत्र
हरियाणा भाजपचे अध्यक्ष मोहनलाल बडोली यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदान कमी होण्याच्या भीतीने 1 ऑक्टोबर ही मतदानाची तारीख बदलण्याची विनंती केली होती. 1 ऑक्टोबरच्या मतदानाच्या आधी आणि नंतर अनेक सुट्ट्या आहेत, त्यामुळे कमी मतदान होऊ शकते, त्यामुळे ही तारीख बदलली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.
मोहनलाल बडोली यांनी आयोगाला पत्र लिहून 1 ऑक्टोबर रोजी मतदानाच्या आधी आणि नंतर सुट्ट्या पडत असल्याचे म्हटले आहे. या सुट्यांमुळे लोक बाहेर फिरायला जाऊ शकतात. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो. या आधारावर त्यांनी निवडणूक आयोग आणि हरियाणाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून मतदानाची तारीख बदलण्याची विनंती केली होती.
1 ऑक्टोबरच्या आधी आणि नंतर अनेक सुट्ट्या
28 तारखेला शनिवार आणि 29 तारखेला रविवार, 30 तारखेला सोमवार म्हणजेच कामाचा दिवस असून मंगळवार, 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी असते, तर 3 ऑक्टोबरला अग्रसेन जयंतीची सुट्टी असते. अशा परिस्थितीत 6 दिवसांचा लाँग वीकेंड असल्याने लोक सुट्टीवर जाऊ शकतात.