Nepal Bus Accident : नेपाळमध्ये शुक्रवारी झालेल्या बस अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ येथील काठमांडू येथे देवदर्शनासाठी जात असताना भाविकांची बस दरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातात महाराष्ट्रतील जळगावच्या 27 भाविकांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह शनिवारी जळगाव येथे आणण्यात आले आणि अंत्य संस्कार करण्यात आलेत.
नेपाळ येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबियांसोबत सरकार उभे असून त्यांना मदत म्हणून 5 लाख रुपये देणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज रविवारी जळगाव येथे ‘लखपती दीदीं’चा (Lakhpati Didi) मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जळगाव विमानतळ परिसरात हा कार्यक्रम होत आहे. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करत कुटुंबियांना मदतनिधीची घोषणा केली आहे.
शुक्रवारी नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील आयना पहाडा येथे बसचा भीषण अपघात झाला. एक भारतीय पर्यटक बस महामार्गावरून 150 मीटर खाली नदीत कोसळली. या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला, तर उर्वरितांना वाचवण्यात बचाव कार्याला यश आले. बसमध्ये चालक आणि कंडक्टरसह 43 जण होते. पर्यटक बस पोखराच्या रिसॉर्टमधून काठमांडूच्या दिशेने जात होती. त्यादरम्यान ही घटना घडली असल्याचे समोर आले.