Kolkata Rape Murder Case : कोलकाता आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेबाबत देशभरात निदर्शने होत आहेत. पीडितेच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी लोकांची मागणी आहे.
आता या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठे वक्तव्य केले आहे. महिलांविरोधातील गुन्हे हे अक्षम्य पाप असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हंटले आहे. महाराष्ट्रातील जळगाव येथील आयोजित केलेल्या लखपती दीदी मेळाव्यात मोदींनी हे वक्तव्य केले आहे.
पीएम मोदींचे वक्तव्य
या घटनेबाबत पीएम मोदी म्हणाले की, “महिलांविरोधातील अपराध अक्षम्य पाप आहे. अशा प्रकरणांमध्ये दोषी कुणीही असो, त्याला शिक्षा व्हायला हवी. तसेच कोणत्याही रूपात त्याला मदत करणारे शिक्षेपासून वाचले नाही पाहिजेत. मग ते रुग्णालय असो, शाळा असो, कार्यालय असो किंवा पोलिस यंत्रणा…कुठल्याही स्तरावर निष्काळजीपणा झाला असेल तसेच कारवाईस टाळाटाळ केली
जात असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. सरकार येतील आणि जातील पण महिलांच्या जीवनाचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण एक समाज आणि सरकार म्हणून आपली मोठी जबाबदारी आहे. आमचे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी कायदा सातत्याने कडक करत आहे.” असे पंतप्रधान यांनी म्हंटले आहे
आरजी कार मेडिकल कॉलेज बलात्कार-हत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी अनेक ठिकाणी निदर्शने केली जात आहेत. या घटनेला 16 दिवस उलटून गेले आहेत आणि यादरम्यान किमान 5 इतर बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. बदलापूर, आसाम, मुझफ्फरनगरमध्ये या ठकाणी देखील गंभीर घटना घडल्या आहेत. अशातच आता देशभरातून महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.