Sanjay Raut : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगावात ‘लखपती दीदी’ हा मेळावा होत आहे.पंतप्रधान या कार्यक्रमांतर्गत 11 लाख नवीन लखपती दीदींचा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करणार आहेत. पंतप्रधान मोदींसह या मेळाव्याला कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मंत्री आणि नेते उपस्थित आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर मोदींची जळगाव येथील भेट अत्यंत महत्वाची मनाली जात आहे. मात्र, दुसरीकडे मोदींच्या या दौऱ्यावर विरोधक जोरदार टीका करत आहेत. यावर आता उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “मोदी जळगावला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आले आहेत. युक्रेन,पोलंड, रशिया तिकडे देखील भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला गेले होते. जळगावला देखील त्याच कामासाठी आले आहेत. निमित्त आहे लखपती दीदी. ज्या देशात लाखो बेरोजगार आहेत त्यांना देखील लखपती करण्याची गरज आहे. महिलांना पैसे दिले जातात आणि मुख्यमंत्री विचारत आहेत पैसे मिळाले ना पैसे मिळाले ना, ही काय पद्धत झाली का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला
ते पुढे म्हणाले, “प्रधानमंत्री येत आहेत. महाराष्ट्रात एक आंदोलन सुरू आहे. आमच्या बहिणींच्या सुरक्षेबाबत प्रधानमंत्री यांनी अजून एकही शब्द काढला नाही. ज्या जळगावात प्रधानमंत्री जात आहेत त्याच जळगावात पंधरा दिवसात चार जणांवर अत्याचार झाला. याबाबत प्रधानमंत्र्यांना कोणीतरी जाऊन सांगा. पहिले तुम्ही आमच्या दीदींना सुरक्षा द्या. प्रधानमंत्री फिरत राहतील आणि आमच्या बहिणी न्यायासाठी इकडून तिकडे फिरत राहतील,” अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.