PM Modi : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी शेजारील देशाला भेट देणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पाकिस्तान 15-16 ऑक्टोबर रोजी इस्लामाबादमध्ये SCO बैठकीचे आयोजन करत आहे. या बैठकीचे यजमानपद सर्व सदस्य देशांद्वारे केले जाते. यावेळी याची जबाबदारी पाकिस्तानवर आली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे वझीर-ए-आझम शाहबाज शरीफ यांचे निमंत्रण पंतप्रधान स्वीकारणार का? असा सवाल आहे.
मात्र, मोदी इस्लामाबादला जाण्याची शक्यता कमी आहे. या बैठकीत भारताच्या बाजूने कोणीही सहभागी होण्याची शक्यता नाही. पीएम मोदी नेहमीच SCO च्या राज्यांच्या प्रमुखांच्या बैठकीला उपस्थित राहतात परंतु कझाकिस्तानमध्ये झालेल्या बैठकीला ते उपस्थित राहिले नाहीत. पंतप्रधानांच्या जागी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या बैठकीला उपस्थित होते. SCO ही एकमेव बहुपक्षीय संघटना आहे ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान एकत्र काम करतात. दोन्ही देश त्याचे पूर्ण सदस्य आहेत.
पीएम मोदींचा पाकिस्तानवर हल्लाबोल
कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी द्रासमधून पाकिस्तानवर हल्ला चढवला होता. पाकिस्तानने आपल्या इतिहासातून काहीही शिकलेले नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हंटले होते. कारगिल युद्धात आम्ही सत्य, संयम आणि धैर्य दाखवले. त्यावेळी भारत शांततेसाठी प्रयत्न करत होता पण पाकिस्तानने त्या बदल्यात आपला अविश्वास दाखवला. मी दहशतवादाच्या समर्थकांना सांगू इच्छितो की त्यांचे नापाक मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत. कारगिल युद्धात पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आमचे जवान दहशतवादाचा समूळ नायनाट करतील. शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) म्हणजे काय?
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) ची स्थापना 15 जून 2001 रोजी झाली. सुरुवातीला त्यात फक्त चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तानचा समावेश होता. 2001 मध्ये, शांघाय फाइव्ह वरून शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये बदल झाल्यानंतर उझबेकिस्तानचा या संघटनेत समावेश करण्यात आला. भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये SCO चे सदस्य झाले आणि इराणने गेल्या वर्षी 2023 मध्ये सदस्यत्व घेतले. 2024 मध्ये बेलारूसच्या सहभागानंतर, आता यात देशांची संख्या 10 झाली आहे.