नांदेडचे कॉंग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. . बीपी कमी झाल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. या दरम्यान श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आधी नांदेडच्या रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले . पण त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादला उपचारासाठी नेण्यात आले. हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी पहाटे ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचा एक निष्ठावान नेता हरपल्याची भावना काँग्रेसमधील जेष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे .
राजकीय कारकीर्द
मागील दोन दशकांत राज्य विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहांत प्रतिनिधित्व केल्यानंतर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे वयाच्या सत्तरीत २०२४ मध्ये लोकसभेत निवडून आले होते. १९५७ पासून नांदेड जिल्ह्यात बहुतांश खासदार पहिल्याच प्रयत्नात लोकसभेवर निवडून गेले, त्या मालिकेत सरपंचपदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणार्या वसंतरावांचे नावही घेतले जाते.
नायगावच्या अमृतराव चव्हाण यांच्या मोठ्या घराण्यातील वसंतराव हे एक प्रतिनिधी होते. त्यांचे वडील बळवंतराव जिल्ह्याच्या राजकारणात दीर्घकाळ कृतिशील राहिले. आमदारकीचा त्यांचा वारसा वसंतरावांनी पुढे चालविला. अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे यंदा ध्यानीमनी नसताना त्यांच्यावर अचानक लोकसभा निवडणूक लढविण्याचा प्रसंग आला आणि पहिल्या प्रयत्नातच ते यशस्वी ठरले.
चव्हाण यांनी २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय मे २०१४ मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. ते जनता हायस्कूल आणि ॲग्रीचे अध्यक्षही होते.
नांदेड जिल्ह्यात २००९ साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्यानं निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतराव चव्हाण ठरले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण-भास्करराव खतगावकर या नेत्यांविना काँग्रेस जिंकू शकते, हे त्यांनी मोठ्या आश्वासकतेने सिद्ध करत नांदेडमधील काँग्रेसचे वर्चस्व कायम राखले होते . वसंत चव्हाण १९७८ साली आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेवरही काम केले . २००२ साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, पण नंतर लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली. तिथून पुढे तब्बल १६ वर्ष ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा गड असलेल्या नांदेड मतदारसंघात २००४ च्या निवडणुकीत भाजपने शिरकाव केलेला होता.मात्र काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांनी भाजपचे तत्कालीन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पराभवाची धूळ चारत विजय खेचून आणला होता. ५९ हजार ४४२ मतांनी चव्हाणांनी चिखलीकरांवर मात केली होती.