बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका, सेक्रेटरी यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.
बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसून आले. या घटनेनंतर बदलापुरात मोठे आंदोलन करण्यात आले. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेंला अटक केली होती. अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कल्याण न्यायालयातील न्यायाधीश वी ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली होती. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा त्याला न्यायालयासमोर हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांना फरार आरोपी बनवण्यात आले आहे.. याप्रकरणी पोलिसांनी कोर्टात न्यायालयीन कोठडी मागितली होती. आरोपीवर पॉक्सो गुन्ह्यात काही कलम वाढवली आहेत.मात्र यातील तीन आरोपी फरार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
याप्रकरणी दोन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने बदलापूर अल्पवयीन लैंगिक शोषण प्रकरणाचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर या प्रणालीतील त्रुटींबाबत तपासणी करण्यासाठी आणि पुढील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर अत्याचाराची घटना घडलेल्या सदर शाळेवरील संचालक मंडळ शासनाने बरखास्त केले आहे. तसेच या शाळेवर आता प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित यांनी पदभार सांभाळला आहे. त्याचबरोबर त्यांच्या मदतीसाठी सल्लागार म्हणून अंबरनाथचे गटशिक्षण अधिकारी राजकुमार जतकर आणि नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील यांची संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.