आज देशभरात सर्वत्र जन्माष्टमी साजरी केली जात आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदाही या सिद्धिविनायक मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अमरावती शहरासह परिसरातील श्रीकृष्ण मंदिरांमध्ये जन्माष्टमीनिमित्त आज सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाची तयारी शहरातील विविध श्रीकृष्ण मंदिरांसह घरोघरी दिसून आली. जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला श्रीकृष्ण मंदिरे सजवण्यात आली असून, मंदिरांवर आकर्षक फुलांची सजावट व रोषणाई करण्यात आली आहे.दरवर्षी, हा उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला जातो. यंदाही शहरातील श्रीकृष्ण मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कौंडण्यपूर येथील रुक्मिणी द्वारकाधीश मंदिरासह शहरातील ५ मंदिरांमध्ये सोमवारी मध्यरात्री जन्माष्टमीचा सोहळा अनुभवता येणार आहे. दरम्यान जन्माष्टमीनिमित्त शहरात तीन ठिकाणी दहीहंडी स्पर्धाही होणार आहे. ही स्पर्धा २८ ऑगस्ट आणि १ व ४ सप्टेंबरला होईल.
माता रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपुरात जन्माष्टमीचा सोहळा भक्तिभावाने साजरा केला जातो. दरम्यान अमरावती येथील माता खिडकी येथील श्रीकृष्ण मंदिर, राधानगर येथील इस्कॉन मंदिर, कंवरनगर येथील महानुभाव आश्रम आणि जवाहर गेटच्या आतील राधाकृष्ण मंदिरात सोमवारी रात्री श्रीकृष्ण जन्माचा सोहळा रंगणार आहे. माता खिडकी येथील श्रीकृष्ण मंदिर हे सर्वात जुने मंदिर आहे. येथे जाण्याचा मार्ग चिंचोळा असला तरी मंदिराचा परिसर मोठा आहे. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना काही काळ तेथेच थांबून आपल्या मनोकामनाही व्यक्त करता येतात. दरम्यान जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी येथे पाने-फुले आणि पताकांद्वारे सजावट करण्यात येत होती.
जन्माष्टमीच्या या सोहळ्यानंतर २८ ऑगस्टला गाडगेबाबा समाधी मंदिरासमोरील मैदानात गोविंदांचा थरार अनुभवायला मिळेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले असून, ती दुपारी २ वाजता सुरू होईल. त्यानंतर १ सप्टेंबरला अमरावतीची ऐतिहासिक दहीहंडी फुटणार आहे. आ. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे ही स्पर्धा नवाथे प्लॉटवर सकाळी ११ वाजता सुरू होईल. ४ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता पुन्हा एकदा गाडगेबाबा समाधी मंदिरासमोरील मैदानात शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे दहीहंडी स्पर्धा होईल.