सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची चर्चा जोरदार चालू आहे. सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकांची तयारी करताना दिसत आहेत. मात्र आता भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला जाईल परंतु मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतरच जाहीर होईल असं वक्तव्य भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील सर्व पक्ष मिळून मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवणार आहेत असे देखील ते म्हणाले आहेत.
विधानसभेला कोणाला किती जागा मिळतात यावरती सर्व काही अवलंबून असून जिथे ज्या पक्षाला जास्त जागा मिळेल तिथे त्या पक्षाला ती जागा दिली पाहिजे असे देखील ते म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील लाडकी बहीण योजना, मराठा आरक्षण यासोबत बदलापूर अत्याचार प्रकरण यावर देखील भाष्य केले आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा हा अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे त्यामुळे तो मुद्दा निवडणूकीला जोडला जाऊ नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात दहा टक्के आरक्षणाचा फायदा जनतेला झाला आहे. मराठा आरक्षण हा राजकीय नाही तर सामाजिक प्रश्न आहे. मराठा आरक्षणातील अनेक प्रश्न प्रलंबित असून यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येत आहे परंतु या बैठकीला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उपस्थित राहत नाहीत असा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, यावेळी बदलापूर अत्याचार प्रकरणी बोलताना ते म्हणाले आहेत की, बदलापूरची घटना अतिशय गंभीर असून यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनांमुळे पिडीतेच्या आयुष्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. हा राजकीय मुद्दा नाही परंतु अनेक लोक यावरती गदारोळ आणून तो राजकीय करण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. परंतु याचा राजकारणाशी काही संबंध नाही असे वक्तव्य देखील त्यांनी यावेळी बोलताना केले आहे.