आज मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी बघायला मिळणार आहेत. तसेच त्यांना फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस रंगणार आहे.
मुंबईत दादरमधील आयडिअल, जांभोरी मैदान, घाटकोपर, आयसी कॉलनी या ठिकाणी मोठ्या दहीहंडी पाहायला मिळत आहे.तसेच यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांच्याही हंड्या उभारण्यात आल्या आहेत.यावेळी या दहीहंडी फोडणाऱ्याला पथकाला लाखो रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.यासाठी भाजप, मनसे, शिंदेसह सर्वच पक्षांकडून लाखो रुपयांच्या बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.
टेंभी नाक्याला मुख्यमंत्री शिंदेंची दहीहंडी असून बक्षिसाची रक्कम पुरुषांसाठी 1 लाख 51 हजार, महिलांसाठी 1 लाख आहे.ठाणेची ओळख असलेल्या टेंभीनाक्यावरच्या ‘दिघे साहेबांची दहीहंडी’ म्हणून ओळखली जाते. आज ह्या परिसरात मोठमोठ्या कटआउट्स पाहायला मिळत आहेत. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असणारे बॅनर्स पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचही बॅनर आहे. आज दिवसभर ठाणे ,मुंबई आणि मुंबई उपनगरात दही हांडीची धूम पाहायला मिळणार आहे.
त्याशिवाय प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत 1 लाख रुपयाच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे.. या उत्सवामध्ये 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर, भाग्यश्री पटवर्धन, लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
या सर्व दही हंडी उत्सवामध्ये सेलिब्रिटी, राजकीय मंडळी , कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री हे देखील स्वतः अनेक दहीहंडी आयोजनाच्या इथे बाळ गोपाळांचा उत्साह वाढवण्यासाठी जाणार आहेत.
यावर्षी स्वराज्य पक्षाच्या वतीने ऐरोली विधानसभा मतदारसंघ (नवी मुंबई) येथे सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाने चांगलीच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यातच स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे याठिकाणी उपस्थिती लावत परीवर्तनाची प्रतिकात्मक दहीहंडी फोडणार असल्याने याला महत्व आहे.
दादर शिवसेना उद्धव ठाकरे भाजप यांच्या वतीने दादर परिसरामध्ये दहीहंडी उभारण्यात येणार आहे, यातही लाखोंची बक्षीस दिली जाणार आहेत.