सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांतच कोसळल्याची घटना घडली आहे .यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकमेकांवरती जोरदार टीका सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. हा सर्व कार्यक्रम वेळेत पार पडावा म्हणून iछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना कामाच्या दर्जाकडे लक्ष गेले नाही आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच हा पुतळा कोसळला अशी टीका आता विरोधकांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे खासदार आणि स्टार प्रवाहवर राजा शिवछत्रपती या मालिकेत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असे अमोल कोल्हे यांनी देखील यावर भाष्य केले आहे.
याबाबत चौकशीची मागणी करत त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे . या पोस्टमध्ये खासदार अमोल कोल्हे म्हणाले आहेत की, अवघ्या आठ महिन्यांतच पुतळा कोसळणे ही अत्यंत गंभीर घटना आहे. पुतळा बनवताना कामाच्या दर्जाकडे कोणीही लक्ष दिलं नाही केवळ एका विशिष्ट व्यक्तीच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्याच्या हेतूनेच हे काम केले असल्याचे दिसून येत आहे. केवळ विशिष्ट व्यक्तीच्याच हातून अनावरण करण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार स्मारकांचे काम घाईघाईत उरकण्याची दुर्दैवी प्रथा सध्या देशात प्रचलित होत आहे, असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला आहे.
याचसोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे शिवभक्तांना ऊर्जा देणारे “शक्तीस्थळ” असते, आणि म्हणूनच त्यांचे स्मारक उभारताना पुढील शतकांचा विचार करणे देखील तितकेच आवश्यक असते असे देखील अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
सिंधुदुर्ग येथील भंग पावलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा, यावेळी कोणाच्याही स्वार्थासाठी कामाच्या दर्जासोबत कसलीही तडजोड करू नये ही माझ्यासह तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. मात्र ही घटना दुर्दैवी असली तरी शिवभक्तांनी शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्था भंग होऊन छत्रपती शिवरायांच्या विचारांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मिडियावरील पोस्टमध्ये केले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे संतप्त होत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी मालवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जात तोडफोड देखील केली आहे.