Jobs In Canada : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निवडणुका जवळ आल्याने अनेक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच त्यांनी अशी एक घोषणा केली आहे, ज्यामुळे तिथे काम करत असलेल्या भारतीयांवर त्याचा परिणाम होणार आहे.
खरं तर, कॅनडामध्ये मोठ्या संख्येने भारतीय शीख राहतात. अशा परिस्थितीत तेथील सरकारने कोणताही निर्णय घेतला तर त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सोमवारी एक मोठी घोषणा केली. ट्रूडो यांनी कॅनडामध्ये तात्पुरत्या नोकऱ्या करणाऱ्या परदेशींची संख्या कमी करण्याची घोषणा केली आहे.
ट्रुडो म्हणाले, “आम्ही कॅनडामध्ये येणाऱ्या कमी पगाराच्या तात्पुरत्या परदेशी कामगारांची संख्या कमी करत आहोत,” पीएम जस्टिन ट्रूडो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X याबद्दल माहिती दिली. देशातील कामगार बाजारपेठ खूप बदलली आहे. आता आमच्या कंपन्यांनी कॅनेडियन कामगार आणि तरुणांना अधिकाधिक नोकऱ्या देण्याची वेळ आली आहे. असे त्यांनी म्हंटले आहे.
जस्टिन ट्रुडो यांच्या या निर्णयाचा परिणाम कमी पगारावर काम करणाऱ्या आणि कॅनडामध्ये तात्पुरत्या नोकऱ्या करणाऱ्या लाखो परदेशी नागरिकांवर होणार आहे. कॅनडात राहणाऱ्या परदेशी लोकांमध्ये भारतीय शीख आणि विद्यार्थी सर्वाधिक आहेत. जे तेथे राहून छोटे व्यवसाय आणि कंपन्यांमध्ये काम करतात.
बेरोजगारीत वाढ
कोरोनानंतरच्या काळात कामगारांच्या तीव्र टंचाईदरम्यान सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर कॅनडात परदेशी कामगारांच्या संख्येत ऐतिहासिक वाढ झाली आहे. काही कॅनेडियन तज्ञांचे असे मत आहे की या निर्णयामुळे स्थानिक लोक आणि तरुणांमध्ये बेरोजगारी वाढली आहे.
या सर्व प्रकारामुळे ट्रुडो यांना आता कॅनडामध्ये तात्पुरत्या नोकऱ्या करणाऱ्या परदेशी लोकांची संख्या कमी करण्याची घोषणा करावी लागली आहे. कॅनडामध्ये स्थानिक लोकांना जास्तीत जास्त नोकऱ्या देण्याबाबत चर्चा झाली आहे. जेणेकरून कॅनेडियन लोकांना जास्तीत जास्त रोजगाराचा लाभ मिळू शकेल.