Raj Thackeray : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांतच कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी 26 ऑगस्ट रोजी घडली. यावरून आत राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. तसेच राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
काल घडलेल्या या घटनेनंतर आता विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे, अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत सरकारवर टीका केली आहे.
पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले, ‘मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे लिहिले, ‘मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती? आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील ‘पाच पुतळ्यांवरची’ कविता आठवली. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दामून देत आहे.’
मध्यरात्र उलटल्यावर, शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले.
ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले, मी फ़क्त मराठ़्यांचा.
आंबेडकर म्हणाले, मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले, मी तर फ़क्त, चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
पुढे राज ठाकरे म्हणतात, ‘पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे. ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो.”