Mamata Banerjeee : कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेने पश्चिम बंगालमधील वातावरण आता चांगलेच तापले आहे. भाजपसह विविध संघांकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या घटनेत सरकार दोषी असल्याचे म्हंटले जात आहे.
अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. संदीप घोष यांच्याबाबत सीबीआयच्या खुलाशामुळे सरकार अडचणीत आले आहे. अशातच आता विद्यार्थ्यांनी ‘नबन्ना मार्च’ची घोषणा करून त्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ केली आहे.
मंगळवारी हजारो विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे. या विद्यार्थ्यांना भाजपचा पाठिंबा मिळत असल्याची माहिती आहे. या विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा. हा मोर्चा हिंसक वळण घेण्याची भीती पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. म्हणून आज शहरात तब्बल सहा हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
कोलकाता पोलिसांनी सांगितले की, “नबन्ना मोहिमेच्या नावाखाली काही जण जमावात सामील होऊन हिंसाचार पसरवू शकतात. नबान्ना अभियानाची घोषणा करणाऱ्या ‘पश्चिमबंगा छात्र समाज’ या संघटनेच्या एका नेत्याने शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विरोधी पक्षनेत्यासोबत बैठक घेतल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. एडीजी कायदा आणि सुव्यवस्था मनोज कुमार वर्मा यांनी दावा केला की एवढ्या मोठ्या रॅलीसाठी पोलिसांकडून कोणतीही परवानगी मागितलेली नाही.” या रॅलीपासून सामान्य जनता आणि विद्यार्थ्यांना दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
रॅली कोणी बोलावली?
‘पश्चिमबंगा छात्र समाज’ संघटना आणि संगमरी समिती मंचने नबन्ना रॅली काढली आहे. यामध्ये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत सोशल मीडियावर अनेक मोहिमा देखील राबवल्या जात आहेत. ही रॅली नबन्ना पर्यंत काढणार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. हावडा येथे नबन्ना भवन म्हणजे राज्य सचिवालय आहे. म्हणूनच या आंदोलनाला नबन्ना आंदोलन असे नाव देण्यात आले आहे.
ही रॅली ममता यांनी राजीनामा द्यावा यासाठी काढली जात आहे. याच पार्श्ववभूमीवर शहरात ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तसेच हजारोंच्या संख्यने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच ऐतिहासिक हावडा ब्रीजही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुलावर आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड्सने लोखंडी भिंत उभारण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे.
शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्लीत येणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी ज्याप्रकारे बंदोबस्त ठेवला होता त्याचीच झलक हावडामध्ये पाहायला मिळत आहे. आंदोलनाच्या मार्गावर ड्रोनने करडी नजर ठेवली जात आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे. मंत्रालय आणि ममतांच्या घराभोवती देखील बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तसेच पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.