CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सीबीआय प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने हा निर्णय दिला आहे. आता मुख्यमंत्री केजरीवाल यांना ३ सप्टेंबरपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे.
दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात सीएम केजरीवाल यांच्या कोठडीची मुदत 27 ऑगस्ट रोजी पूर्ण होणार होती. यानंतर सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांच्या कोठडीत पुन्हा वाढ केली. यासाठी सीएम केजरीवाल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर झाले.
याआधीही 5 ऑगस्ट रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सीबीआयच्या अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावत त्यांना जामिनासाठी खालच्या न्यायालयात जाण्यास सांगितले होते.
या संदर्भात सीबीआयने 23 ऑगस्ट रोजी न्यायालयाला सांगितले होते की, “सीएम अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे आमदार दुर्गेश पाठक यांच्यावर अबकारी धोरण प्रकरणात खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.” यासोबतच सीबीआयने केजरीवाल यांच्याविरोधात न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते.
21 मार्च रोजी अटक
दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने 21 मार्च 2024 रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. यानंतर पुन्हा 26 जून रोजी सीबीआयने कथित घोटाळ्यात भ्रष्टाचाराचा आरोप करत मुख्यमंत्री केजरीवाल यांना पुन्हा अटक केली.
अंतरिम जामीन
सीएम अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. ईडीच्या अटकेप्रकरणी सुप्रीम कोर्टाने १२ जुलै रोजी सीएम केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र, सीबीआयच्या अटकेप्रकरणी त्यांना अजूनही तुरुंगातच राहावे लागणार आहे.