आगामी विधानसभा निवडणुकांची राज्यात जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकी दरम्यान अनेक नेते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा देखील रंगत आहेत. अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण येत आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील देखील पक्षांतर करणार अशा चर्चा होत होत्या यावर आता हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीत हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहात का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी भाष्य केले आहे. महायुतीमधून अजून कोणताही निर्णय जाहीर केला गेला नाही. युतीमधील एखाद्या पक्षाने सांगितले की आमचा उमेदवार ठरला आहे तर तो त्या पक्षाचा उमेदवार झाला मात्र महायुतीचा नाही असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
मला आत्तापर्यंत 17-18 निवडणुकांचा अनुभव आहे. सतत लोकांमध्ये आमचा वावर असतो आम्ही तालुक्यामध्ये फिरत असतो लोकांचा आमच्याकडे आग्रह आहे की, मी निवडणुकीसाठी उभे राहिले पाहिजेत असे देखील हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.
याचसोबत पुढे बोलताना ते म्हणाले आहेत की,मतदार आता खुलेआम बोलायला लागला आहे. मलासुद्धा ही गोष्ट आमच्या वरिष्ठांच्या कानावर घालावी लागणार आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी आम्हाला यासंदर्भातील अंतिम निर्णय सांगितलेला नाही.
तसेच सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती असतात. सगळी माहिती सगळीकडे पसरत असते. मला वाटतं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देखील ही माहिती आहे. महाराष्ट्रातील मतदार वेगळे आहेत महाराष्ट्रातील राजकारण वेगळे आहे. मतदारांची विचार करण्याची पद्धत देखील वेगळी आहे असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी नुकतंच राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यादरम्यान माझी शरद पवारांशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मात्र देवेंद्र फडणवीस याबद्दल कधी निर्णय घेतात, याची मी वाट पाहत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे.