दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के.कविता यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आमदार के कविता यांच्या जामीनाला सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी मिळाली आहे. दिल्ली मद्यधोरण प्रकरणी आमदार के कविता यांना मार्चमध्ये अटक करण्यात आली होती.
के. कविता या विधान परिषदेच्या आमदार आहेत तसेच माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या त्या कन्या आहेत. न्यायमूर्ती बी आर गवई आणि के.वी. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. याप्रकरणी के कविता यांना जामीन देण्याचे आदेश न्यायमूर्तींकडून देण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन देण्यात आला असला तरी के कविता यांच्यावर अनेक अटी घातल्या गेल्या आहेत. साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये तसेच पुराव्यांची छेडछाड करू नये असे देखील त्यांना सांगण्यात आले आहे. के कविता यांचा पासपोर्ट जमा करून घेण्याचे आदेश देखील सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
याआधी के कविता यांच्यासोबत मद्य धोरण प्रकरणाचे आरोप असलेले मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर करण्यात आला होता याच आधारावर के कविता यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद करून के कविता यांना जामीन मंजूर करून देण्यास प्रयत्न केले.
याच दिल्ली मद्य गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक झालेली असून ते सध्या तुरुंगात आहेत.
दरम्यान, के. कविता यांच्यासोबत चनप्रीत सिंग, दामोदर, प्रिन्स सिंग आणि अरविंद कुमार यांच्या विरोधातही याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.