Gujarat Rain : पुढील काही दिवस गुजरातसह काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी आणि मंगळवारी सकाळी मुसळधार पावसाने गुजरातमध्ये जोरदार हजेरी लावली, या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पुरात तीन लोकांचा मृत्यू झाला, तर सुमारे 20,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
IMD नुसार, गुरुवारी सकाळपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रशासन शक्य ती पावले उचलत आहे. सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी प्रमुख शहरांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ नागरी अधिकाऱ्यांची आभासी बैठक घेतली. आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला.
काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारपासून पुढील तीन दिवस गुजरातमधील २७ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेड अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये कच्छ, मोरबी, सुरेंद्रनगर, जामनगर, राजकोट, द्वारका, पोरबंदर, गीर सोमनाथ, जुनागढ, पंचमहाल, दाहोद, तापी, नवसारी, वलसाड, अहमदाबाद, बोताड, अमरेली, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, नर्मदा, वडोदरा, छोटा उदेपूर, सुरत आणि डांग्स यांचा समावेश आहे.
तर गुजरातच्या वडोदरा, सुरत, भरूच, नवसारी, वलसाड, अमरेली आणि भावनगर या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस सकाळपर्यंत ‘मुसळधार ते अति मुसळधार’ पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
अनेक भागात पूरसदृश परिस्थिती
अहमदाबाद आणि राजधानी गांधीनगरच्या काही भागातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले आहेत, तसेच अनेक पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. कच्छमध्ये, मुसळधार पावसामुळे नख्तरणा-लखपत महामार्गाला पूर आला होता, तसेच या पावसामुळे वलसाड आणि नवसारी जिल्ह्यात अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या आकडेवारीनुसार, या भागात गेल्या २४ तासांत सर्वाधिक ३५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.