Kolkata Rape Murder Case : भाजपने बंगालमध्ये बुधवारी म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी 12 तासांच्या बंदची हाक दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली, ज्यात त्यांनी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कथित क्रूरतेचा तीव्र निषेध केला.
यावर आता ममता बॅनर्जी सरकारने आदेश जारी करून म्हटले आहे की, “बंगाल सरकार हे सुनिश्चित करेल की बुधवारी भाजपच्या 12 तासांच्या बंदमुळे सामान्य जनजीवन प्रभावित होणार नाही.”
पश्चिम बंगाल सरकारने मंगळवारी लोकांना 28 ऑगस्ट रोजी भाजपच्या 12 तासांच्या सर्वसाधारण संपात सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. बंद असूनही स्थिती सामान्य राहण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मुख्य सल्लागार अलपन बंडोपाध्याय म्हणाले की, वाहतूक सेवा सुरू राहतील आणि दुकाने आणि व्यवसाय सुरू राहतील अशी अपेक्षा आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
आंदोलकांवर लाठीचार्ज
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधुराच्या, तसेच जमाव पांगवण्यासाठी पाण्याचा वापर केला, या महिन्याच्या सुरुवातीला आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या पार्श्वभूमीवर आंदोलक मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेत सरकराने काही लोकांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करत ममता यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, यासाठीच आज विद्यार्थ्यांनी ‘नबन्ना मार्च’ची घोषणा केली.
याच पार्श्ववभूमीवर आज विद्यार्थ्यांचा जमाव रस्त्यावर उतरला, या जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला, शांततेने सुरु असलेल्या आंदोलनाला पोलिसांनी हिंसक वळण दिल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी म्हंटले आहे, आणि याच निषेधार्थ उद्या बंगाल बंदची हाक दिली.
दरम्यान, भाजपच्या ‘बंगाल बंद’ हाकेला प्रतिक्रिया देताना तृणमूल काँग्रेसने जनतेला त्याकडे लक्ष देऊ नये असे आवाहन केले. तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष म्हणाले, “बंगालमध्ये दहशत आणि अराजकतेची परिस्थिती निर्माण करण्यासाठी ही सुनियोजित योजना आहे. भाजपने पोलिसांवर हल्ला करण्यासाठी बंगालच्या बाहेरून कार्यकर्ते आणले आहेत.”
ते पुढे म्हणाले, “त्यांना पोलिसांना लोकांवर गोळीबार करण्यास प्रवृत्त करायचे होते, जसे या सरकारने 1993 मध्ये केले होते, परंतु त्यांची योजना अयशस्वी झाली. त्यामुळेच त्यांनी बंदची हाक दिली.
दरम्यान, टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी सांगितले की, “पोलिसांवर विटा फेकण्यात आल्या, एसएचओचे डोके फोडण्यात आले, पोलीस कर्मचारी जखमी झाले आणि भाजपने पोलिसांच्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे. त्यांना न्याय नको आहे. त्यांना निवडणूक न जिंकता मुख्यमंत्र्यांची खुर्ची बळकावायची आहे.” असा आरोप त्यांनी यावेळी केला.