मुंबईसह महाराष्ट्रात काल मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव पार पडलेला बघायला मिळाला,. मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस रंगल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव पार पडत असताना मात्र थरावरुन कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत. त्यामुळे दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले आहे. मुंबईसह ठाण्यात आतापर्यंत 238 गोविंदा जखमी झाले आहेत. या गोविंदांवर सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 238 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यातल्या 32 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 204 जणांना उपचार करून सोडून देण्यात आले आहेत. तसेच २ जणांची प्रकृती गंभीर आहे.
मुंबईत गोविंदाच्या जीवाला काही होवू नये यासाठी सर्व उपाययोजना दहिहंडी आयोजकांनी केल्या होत्या. आरोग्यसेवाही तैनात होती. शिवाय त्याबाबतची काळजीही गोविंदा पथके घेत होती. त्यामुळे मोठी हानी कुठेही झाली नाही. अनेक गोविंदांना किरकोळ मार लागल्याचे समोर आले आहेत.
महाराष्ट्राच्या अनेक भागात आणि इतरत्र लैंगिक छळाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, अनेक गोविंदा गटांनी मुंबई, ठाणे आणि इतर ठिकाणी दहीहंडी फोडून बॅनर आणि पोस्टर्सद्वारे सामाजिक संदेश प्रदर्शित केले. तसेच अनेक महिला गोविंदा गट मानवी पिरॅमिड बनवून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करताना दिसले.
उत्सवानिमित्त शहरातील अनेक भागात प्रमुख चौकात दहीहंडी टांगण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई आणि परिसरातील राजकारण्यांनी प्रायोजित केलेल्या दहीहंडीला सेलिब्रिटींची उपस्थिती आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांमुळे मोठी गर्दी झालेली बघायला मिळाली.