सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु मंगळवारी हा पुतळा कोसळला आहे. या घटनेवरून राजकीय वर्तुळात आता जोरदार टीका सुरू आहे. या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे.
आठ महिन्यांपूर्वीच नौदल दिनानिमित्त या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु अवघ्या आठ महिन्यातच पुतळा कोसळल्याने विरोधकांकडून यावर टीका केली जात आहे. यावर राज्य सरकारने स्पष्टीकरण देत हा पुतळा नौदल विभागाने बांधला आहे असे सांगितले आहे.
यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही अतिशय दुःखद घटना आहे परंतु यावरून राजकारण करू नये. राजकोट किल्ल्यावरील वाऱ्यांचे आकलन शिल्पकाराला पुतळा उभारताना करता आले नाही यामुळे हा पुतळा कोसळला आहे. नौदलाच्या मदतीने त्याच ठिकाणी नवा पुतळा उभा करू असे भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर याचे अनेक भग्न अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की खरा मावळा हे फोटो कधीच व्हायरल करणार नाही. अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अफझलखानासारख्या कितीही प्रवृत्ती चालून आल्या तरी आम्ही लोकशाही पद्धतीने त्याचा कोथळा बाहेर काढू” असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर भग्नावस्थेतील पुतळ्याचे फोटो एक्सवरुन शेअर केले होते आणि सरकारवर हल्लाबोल केला होता यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवरच निशाणा साधला असल्याचे सांगितले जात आहे.