Bangla Bandh : कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ भाजपने आज बंगाल बंदची हाक दिली आहे. या बंद दरम्यान पश्चिम बंगालमधील भाटपारा येथे भाजप नेते प्रियांशू पांडे यांच्या कारवार 6 राऊंड गोळीबार करण्यात आला. या घटनेत भाजप नेते आणि कार चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. टीएमसी कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याचा आरोप आहे.
टीएमसी कार्यकर्त्यांवर आरोप
गोळीबाराच्या वेळी भाजप नेते गाडीत उपस्थित होते. गोळी लागल्याने भाजप नेते प्रियांशू पांडे यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या चालकाला देखील गोळी लागल्याची माहिती आहे. तसेच त्यांच्या गाडीवर देशी बनावटी बॉम्बही फेकला गेला. घटनास्थळावरून पोलिसांनी देशी बनावटीचा बॉम्बही जप्त केला आहे.
भाजप नेत्या लॉकेट चॅटर्जी यांना अटक
दरम्यान, बंगालमध्ये अनेक ठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. कोलकाता येथील बाटा चौकात निदर्शने करणाऱ्या भाजप नेत्या लॉकेट चॅटर्जी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजपने आज 12 तासांच्या बंदची हाक दिली असून, ती संध्याकाळी 6 वाजता संपणार आहे.