Asaram Bapu Admitted in Pune : लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू यांना आज पुण्यात आणण्यात आले आहे. आसाराम बापू यांना राजस्थान उच्च न्यायालयाकडून सात दिवसांसाठी तब्येतीच्या कारणास्तव पॅरोल मिळाला आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी पॅरोल मंजूर केला आहे.
आज ते आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले असून, येथे त्यांच्यावर पुढील सात दिवस उपचार चालतील. ते पुण्यातील माधवबाग रुग्णालयात उपचार घेणार आहेत. त्यांना आधी इंडिगोच्या विमानाने मुंबईला नेण्यात आले आणि तेथून पुण्यात आणण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत जोधपूरचे पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी होते.
13 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने आसाराम यांना सात दिवस पोलिस कोठडीत राहून महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती. त्यांच्यावर आता पुण्याच्या खाजगी कॉटेजमध्ये ठेऊन हृदयाशी निगडित आजारावर उपचार केले जाणार आहेत. त्यांना पोलिस कोठडीमध्ये राहूनच हे उपचार घ्यावे लागणार आहेत.
आसाराम बापूला येथील रुग्णालयामध्ये ठेवण्यात आल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती पुणे पोलिसांनी व्यक्त केली होती. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायमूर्ती पी.एस. भाटी आणि न्यायमूर्ती मुन्नारी लक्ष्मण यांच्या पीठाने काही अटींसह त्यांचा पॅरोल मंजूर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर होणारे उपचार आणि वाहतुकीचा खर्च यासह पोलिसांच्या मदतीचा खर्च आसाराम यांना स्वतः करावा लागणार आहे. तत्पूर्वी, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्याशिक्षेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली होती.