बदलापूर शहर पुन्हा एकदा अशांत झाले आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, ज्यात आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून, मुलीचा बापच असल्याचे समोर आले आहे . या घटनेने शहरभर पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली असून आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.
काही आठवड्यांपूर्वीच बदलापूरातील एका शाळेत तीन ते चार वर्षांच्या मुलींवर अत्याचार झाला होता, ज्यामुळे शाळेतील पालक आणि नागरिकांनी आंदोलन केले होते. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. पालकांनी मोठे आंदोलन करत आरोपीला शिक्षेची मागणी केली होती. ही घटना ताजी असताना आता आणखी एक घटना बदलापूरमध्ये उघडकीस आली आहे.
बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला असल्याचे वृत्त समोर आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे पीडित मुलीच्या वडिलांनीच तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 54 वर्षीय आरोपी वारंवार पीडित मुलीवर अत्याचार करत होता. तसंच तिला मारहाणदेखील करत होता. 22 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा पीडितेवर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर ती घाबरून घरातून पळून गेली. मात्र, नंतर उशिराने ती रात्री घरी परतली. त्यानंतर सोमवारी तिने वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी या नराधम वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
शाळेतील घटनेनंतर त्यावर पोलिसांची आणि प्रशासनाची प्रतिक्रिया देखील धीमी होती. आता पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने बदलापूरातील नागरिक आणि पालक भयंकर संतापले आहेत.
पोलीस पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा गरजेची असून, या प्रकरणात तातडीने कारवाई आणि कठोर शिक्षा हेच फक्त समाधानकारक उत्तर असू शकते.
यामुळे आपली जबाबदारी फक्त संताप व्यक्त करण्यापर्यंत मर्यादित नसून, अशा घटनांमध्ये न्याय मिळवण्यासाठी, सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणे आणि सामाजिक जागृती करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.