Narayan Rane : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु मंगळवारी हा पुतळा कोसळला आहे. या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आठ महिन्यांपूर्वीच नौदल दिनानिमित्त या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु अवघ्या आठ महिन्यातच पुतळा कोसळल्याने विरोधकांकडून यावर जोरदार टीका केली जात आहे. अशातच आज राजकोट किल्ल्यावर भाजप विरुद्ध महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे आज राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. अगदी त्याचवेळी नारायण राणे आणि निलेश राणे देखील तिथे दाखल झाले. यावेळी पोलिसांनी दोन्ही राणेंना आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशीच थांबवले. यानंतर राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये तुफान बाचाबाची झाली.
यावेळी निलेश राणे यांनी उपस्थित पोलिसांना सक्त ताकत दिली. ते म्हणाले आम्ही आमचा वेळ पोलिसांना दिला होता आणि तरीही हे कस काय घडलं? हे बाहेरून येऊन अंगावर येत आहे ? असा प्रश्नही निलेश राणे यांनी उपस्थित केला. त्यांना गुपचूप निघायला सांगा असेही ते म्हणाले. तसेच पोलिसांनी देखील आमच्या कार्यकर्त्यांना हात लावायचा नाही असं भाजप नेते निलेश राणे त्यावेळी म्हणाले.
तर नारायण राणे यांनीही संतप्त प्रतिक्रिया देत, “यापुढे आमचे पोलिसांना असहकार्य असणार आहे. त्यांना परत येऊ दे. त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी देखील द्या, मग मी एकेएकाला बघतो. घरात रात्रभर ठेचून एकेकाला मारुन टाकेन. मग कोणालाही सोडणार नाही.” अशी धमकी दिली आहे.
हा सगळा गोंधळ सुरु असताना ठाकरे गटाकडून सुद्धा पोलिसांना इशारा देण्यात आला. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जर आम्हाला पंधरा मिनिटांमध्ये रस्ता करून दिला नाही, तर शिवसेना रस्त्यावरची संघटना आहे आम्ही सुद्धा दाखवून देऊ असा इशारा दिला आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. त्यांना वाटत असेल आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या असतील, पण तसं काही नाही असं म्हणत पलटवार केला आहे.