Droupadi Murmu : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल हॉस्पिटलमध्ये 31 वर्षीय डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रथमच वक्तव्य आले आहे. या संपूर्ण घटनेवर त्यांनी निराशा व्यक्त केली आहे.
यावर मुर्मू म्हणाल्या की, मुलींवरील असे गुन्हे मान्य नाहीत. राष्ट्रपतींनी या घटनेवर भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
देशातील महिलांवरील गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांबाबत त्या म्हणाल्या की, “कोणताही सुसंस्कृत समाज मुली-बहिणींवर होणारे असे अत्याचार सहन करू शकत नाही. आता पुरे झाले. समाजाने प्रामाणिक आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.” तसेच त्यांनी या घटनेवर भयभीत आणि निराश असल्याचे म्हंटले आहे.
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्ट रोजी 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांमध्ये असंतोष वाढला आणि डॉक्टर संपावर गेले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला अटक केली आहे.
हे प्रकरण आता सीबीआयकडे सोपवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत सीबीआयला आतापर्यंतच्या तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यानंतर सीबीआयने कोर्टात स्टेटस रिपोर्ट दाखल केला.
8-9 ऑगस्टच्या रात्री काय घडले?
आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा आरोपी संजय रॉय हा 8 आणि 9 तारखेच्या रात्री वेगवेगळ्या बहाण्याने एकूण चार वेळा आरजी हॉस्पिटलमध्ये गेला होता. यापैकी तीन वेळा तो हॉस्पिटलमध्ये फिरून बाहेर आला होता. मात्र चौथ्या आणि शेवटच्या वेळी हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर त्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याचा आरोप आहे.