महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक (डीजी) संजय पांडे यांच्याविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार आणि गैरप्रकारांशी संबंधित विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) फोन टॅपिंग प्रकरण आणि शेअर मार्केट मॅनेजमेंट घोटाळ्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुन्हे दाखल केले आहेत.
या प्रकरणात, संजय पांडे यांच्यावर २००९ ते २०१७ दरम्यान एनएसईच्या कर्मचार्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप आहे. तसेच, त्यांनी ‘इंटेलिजन्स सिस्टीम्स अँड मार्केट सोल्यूशन्स’ या कंपनीच्या माध्यमातून अनधिकृतरित्या सेवा दिल्याचा आरोपही आहे. या आरोपांमुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, आणि सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.
संजय पांडे यांच्यासह सात जणांविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे तपास सुरू करून मला आणि इतर व्यवसायिकांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याची धमकी देऊन आमच्याकडून पैसे उकळले असे तक्रारीत म्हटले आहे. या समोर आलेल्या प्रकरणांमुळे आता संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणामुळे राज्यातील प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, कायद्यानुसार योग्य ती कारवाई या माजी पोलीस महासंचालकांवर व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या आधीही संजय पांडे यांना फोन टॅपिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. चौकशीनंतर संजय पांडेंना अटक करण्यात आली होती.मात्र त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.