Mohamed Muizzu : मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी सत्तापालटाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. खरं तर, मालदीव सरकारने (BML) डेबिट कार्डद्वारे व्यवहारांवर बंदी घातली होती, तर क्रेडिट कार्डद्वारे मासिक खर्चाची मर्यादा 100 डॉलर्सपर्यंत वाढवली होती, त्यानंतर देशात आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याचा धोका होता. मात्र, नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.
बँकेच्या या निर्णयाबाबत अध्यक्ष मुइज्जू यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुइज्जू यांनी याला सत्तापालटाचा प्रयत्न म्हटले आहे. बीएमएल बँकेच्या या पावलांची चौकशी सरकार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मालदीव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील शेकडो बनावट खाती लोकांना सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्यास सांगण्यासाठी वापरली जात आहेत, लोकांमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बँकेच्या निर्णयाविरोधात चौकशीचे आदेश
बँक ऑफ मालदीवचे म्हणणे आहे की, बँकेकडे परकीय चलनाची विक्री स्थिर असताना कार्डच्या माध्यमातून परकीय चलन जास्त प्रमाणात खर्च केले जात असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी पीपल्स नॅशनल काँग्रेसच्या (पीएनसी) बैठकीत अध्यक्ष मुइज्जू यांनी बँकेचा हा निर्णय त्यांच्या सल्ल्याविरुद्ध असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. सरकार तपासात हस्तक्षेप करणार नाही, असे मुइज्जू यांनी म्हटले आहे.
मालदीवच्या या सरकारी बँकेत मुइज्जू सरकार अल्पमतात आहे. बीएमएलच्या नऊ संचालक मंडळांपैकी केवळ चार संचालक सरकारचे आहेत. बँकेने विद्यमान सरकारच्या हिताचे काम केले पाहिजे, असे असताना सभासद मंडळ मागील सरकारशी अधिक निष्ठावान असल्याचा आरोप मुइज्जू यांनी केला आहे. मुइज्जू यांनी विरोधकांवर सत्तापालटाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे आणि त्याचा संबंध शेजारील देशांतील घडामोडींशी जोडला आहे. सरकार पाडण्याचे हे बेकायदेशीर प्रयत्न थांबवण्यासाठी सर्व घटनात्मक अधिकार वापरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मालदीवमधील विरोधी पक्ष डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) ने मुइज्जू यांचे आरोप फेटाळले आहेत. पक्षाचे अध्यक्ष फयाज इस्माईल यांनी आरोपांचा निषेध केला आणि ते म्हणाले की, हे अत्यंत खालच्या पातळीवरचे आरोप आहेत. मुइज्जू सरकारमधील अंतर्गत मतभेदांमुळे हे घडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आगामी काळात मुइज्जू यांना अध्यक्षपदासाठी त्यांच्याच पक्षाकडून अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, असेही इस्माईल यांचे म्हणणे आहे.