Giriraj Singh : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी सातत्याने भाजपच्या रडारवर आहेत. आता केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी त्यांची तुलना थेट उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यांच्याशी केली आहे. गिरीराज सिंह म्हणाले, आतापर्यंत संपूर्ण जगात एकच हुकूमशहा होता, किम जोंग, पण आता ममता बॅनर्जी दुसऱ्या हुकूमशहा झाल्या आहेत.
गिरीराज सिंह म्हणाले, “बंगालमध्ये ममता बॅनर्जी हुकूमशहाच्या रूपात आहेत. ममता यांचे सरकार गुंडांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. राज्यातील गुन्हेगार हे टीएमसीचे कार्यकर्ते आहेत. महिला असूनही ममता बॅनर्जींना लाज वाटत नाही.” अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
याआधी बुधवारी कोलकाता बलात्कार प्रकरणी भाजपने बंगाल बंदची हाक दिली होती. यावरून ममता बॅनर्जी भाजपवर संतप्त झाल्या आहेत. ममता बॅनर्जी म्हणाल्या, बंगालमध्ये कोणी आग लावण्याचा प्रयत्न केला तर सर्वत्र आग लागेल. त्या म्हणाल्या, “काही लोकांना वाटते की हा बांगलादेश मला आवडतो, तेथील लोक आमच्यासारखे बोलतात. बांगलादेश आणि बंगालची संस्कृती एकच आहे, पण बांगलादेश वेगळा आणि भारत वेगळा देश आहे हे लक्षात ठेवा. मोदीबाबू, तुम्ही तुमच्या पक्षाला फोन करून आग लावता. लक्षात ठेवा, बंगालला आग लावली तर आसामही गप्प बसणार नाही. ईशान्येकडील राज्येही थांबणार नाहीत. ना उत्तर प्रदेश, ना बिहार, ना ओडिशा थांबणार. दिल्लीही शांत बसणार नाही.” असं त्या म्हंटल्या.
डॉक्टरांना कामावर परतण्याचे आवाहन
ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी आंदोलक ज्युनियर डॉक्टरांना कामावर परतण्याची विनंती करते. त्यांच्यावर आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही. एआयच्या माध्यमातून भाजप मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्ह्यात गुंतले आहे, त्यामुळे सामाजिक अराजकता पसरत आहे. भाजपच्या बंदचा उद्देश बंगालला बदनाम करणे हा आहे. आरजी कार हॉस्पिटल बलात्कार-हत्या प्रकरणाचा तपास रुळावरून घसरवण्याचा त्यांचा कट आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील आंदोलक कनिष्ठ डॉक्टरांनी बुधवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कामावर परतण्याचे आवाहन नाकारले. महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाल्याच्या कथित घटनेच्या निषेधार्थ राज्यातील कनिष्ठ डॉक्टर गेल्या २० दिवसांपासून काम बंद ठेवून संपावर आहेत.