Gujarat Flood : गेल्या आठ दिवसापासून गुजरातमध्ये पावसाने कहर केला आहे. सलग सुरू असलेल्या पावसाने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून गेल्या तीन दिवसात मृतांची संख्या २६ वर गेली आहे.
त्याच वेळी, 40 हजारांहून अधिक लोक बेपत्ता आहेत. तर 17000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत. गुजरातमधील अनेक शहरांमध्ये बुधवारी चौथ्या दिवशीही पाऊस सुरूच होता. दरम्यान, वडोदरामधील परिस्थिती चिंताजनक आहे. येथील काही भाग 10 ते 12 फूट पाण्यात बुडाला आहे. या ठिकाणी राज्य सरकारकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. पूरग्रस्त भागात एनडीआरएफ-एसडीआरएफचे जवान येथे सक्रिय आहेत.
गुजरातमधील 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट
हवामान खात्याने गुजरातमधील 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट तर 22 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज गुरुवारीही मुसळधार पावसाची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये IMD ने रेड अलर्ट जारी केला आहे त्यात कच्छ, द्वारका, जामनगर, मोरबी, सुरेंद्रनगर, जुनागढ, राजकोट, बोताड, गिरसोमनाथ, अमरेली आणि भावनगर यांचा समावेश आहे. त्याचबरोबर उत्तर गुजरात, दक्षिण गुजरात आणि मध्य गुजरातमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देवभूमी द्वारका जिल्ह्यातील भानवडमध्ये देखील मुसळधार पाऊस झाला, आजही सौराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वडोदरा येथे मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले असून रस्ते, इमारती आणि वाहने पाण्यात बुडाली आहेत. मोरबी येथे पूल ओलांडताना ट्रॅक्टर ट्रॉली वाहून गेली. त्यात प्रवास करणारे लोक बेपत्ता आहेत तर काहींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
#WATCH | Gujarat: Rescue operation underway at Kirti Mandir Government Quarter in Vadodara as several people are stranded amid a flood-like situation due to heavy rainfall. pic.twitter.com/aBryXgTCBi
— ANI (@ANI) August 28, 2024
पंतप्रधान मोदींनी घेतला पूरस्थितीचा आढावा
गुजरातमधील विनाशकारी पुराच्या संदर्भात पंतप्रधान मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आणि शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. सीएम पटेल यांनी लोकांना वाचवण्यासाठी अनेक पथके तैनात केली आहेत. लोकांची सातत्याने सुटका केली जात आहे. त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे. वडोदरामधून आतापर्यंत 5000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून 1200 जणांची सुटका करण्यात आली आहे.
पाऊस आणि पुरामुळे गुजरातमधील 24 नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. पाऊस आणि पुरामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे मार्ग पाण्याखाली गेले आहेत. अनेक गाड्यांची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. वंदे भारत एक्स्प्रेससह आठ गाड्या रद्द करण्यात आल्या असून अन्य 10 गाड्याही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.