बदलापूर येथील विद्यालयात अवघ्या तीन आणि चार वर्षांच्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे . या घटनेचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. या घटनेवरून राजकीय वर्तुळात टीका टिप्पणी सुरू आहे. विरोधकांनी या घटनेवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावरूनच आता विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप विरोधी पक्षात असता तर त्याने या प्रकरणावरून राजकारण केले नसते असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत की, निर्भयापासून बदलापूरपर्यंत अशा क्रूर घटना घडल्या आहेत. या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी. दिवसेंदिवस क्रूरता वाढतच चालली आहे पण या विषयाला राजकीय नाही तर सामाजिक विषय म्हणून हाताळले पाहिजेत.
याचसोबत पुढे बोलताना त्या म्हणाल्या आहेत की, आम्ही विरोधी पक्षात असतो तर या घटनेवरून आम्ही राजकारण केले नसते असा हल्लाबोल पंकजा मुंडे यांनी केला आहे. या घटनेतील आरोपींना चौकात आणून शिक्षा दिली पाहिजेत असे भाष्य देखील त्यांनी यावेळी केले आहे .
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांच्या ताब्यात आहे तसेच त्याच्यासह इतर आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास चालू आहे. परंतु या घटनेनंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास तब्बल 12 तास लावले होते यामुळेच गृह मंत्रालय आणि राज्य सरकारच्या कारभारावर विरोधक जोरदार टीका करत आहेत.