कोलकत्ता येथील 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार घडला. याचे राज्यभर पडसाद उमटत असतानाच बदलापूर येथील विद्यालयात तीन आणि चार वर्षांच्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली. यानंतर मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. एका पाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.
विरोधकांकडून सरकारवर या घटनेवरून जोरदार टीका केली जात आहे. अस असतानाच आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कुठेतरी काहीतरी चांगल घडायचं असेल म्हणून पुतळा कोसळण्याची घटना घडली असून याच्यापेक्षा मोठा पुतळा उभारण्यात येईल असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
एकीकडे सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांवर आपली प्रतिमा उमटवत आहे तर दुसरीकडे केसरकरांच्या वक्तव्यामुळे सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळेच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकरांनी खडेबोल सुनावले आहेत. काल मालवणमधील प्रकरणावरून केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आले होते त्यावेळी देखील केसरकर भडकले त्यांच्या या कृतीमुळे आणि वक्तव्यामुळेच त्यांना मुखमंत्र्यांनी सुनावले आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यभरात सरकारची प्रतिमा मलिन झालीये. कारवाईची घोषणा नको, तर कृती करा अशा सूचना केसरकरांना दिल्या आहेत. याचसोबत सांभाळून वक्तव्य करा असे खडेबोल देखील मुख्यमंत्र्यांनी केसरकरांना सुनावले आहेत.
दरम्यान, या घटनांमुळे राज्यात लोकांकडून देखील संतप्त प्रतिक्रिया येत असून या घटनांमधील आरोपींना कठोर शिक्षा लवकरात लवकर मिळावी अशी मागणी होत आहे.