Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच केंद्राकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली. मात्र, निवडणुकीसाठीच्या घडामोडींवर पाळत ठेवण्यासाठीच तर ही झेड प्लस सुरक्षा देण्यात येत नाही ना, अशी शंका पवारांनी व्यक्त केली.
शरद पवारांनी अद्याप केंद्राने दिलेली सुरक्षा घेतलेली नाही. दरम्यान, शरद पवारांच्या सुरक्षेबाबत शुक्रवारी दिल्लीमध्ये रिव्ह्यू मीटिंग पार पडणार आहे. यासाठी पवार आज तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. अशास्थितीत शरद पवार सुरक्षा व्यवस्था घेणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. केंद्राने अमित शाह, मोहन भागवत आणि शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता.
केंद्रीय एजन्सींनी संभाव्य धोक्यांचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार यांना उच्चस्तरीय सशस्त्र व्हीआयपी सुरक्षा देण्याची शिफारस केली. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, शरद पवारांनी त्यांना देऊ केलेल्या Z+ सुरक्षेवरुन संशय व्यक्त केला आहे. आणि मला दिलेली सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असल्याचे म्हंटले.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या देखील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांची सुरक्षा आता Z Plus वरून ASL (एडवांस्ड सिक्योरिटी लिएजॉन) करण्यात आली आहे. एएसएल सुरक्षा पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनाच दिली जाते. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या सुरक्षेत वाढ कारण्याबात निर्णय घेण्यात आला होता. आयबीच्या धमकीनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.