Chandrakant Patil : दोन दिवसांपूर्वी पुण्यात सर्वत्र उत्साहात दहीहंडी पार पडली, यातलाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, व्हायरल व्हिडिओमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील आणि कुख्यात गुंड गजानन मारणे एकत्र दिसत आहेत, यावरून आता विरोधक भाजपवर जोरदार हल्ला चढवत आहेत, नेमका काय आहे हा प्रकार? जाणून घेऊया…
काल पुण्यातील दहीहंडीच्या एका कार्यक्रमात कुख्यात गुंड गजानन मारणे याने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडून चंद्रकांत दादांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी मंत्री महोदयांनी देखील पुष्पगुच्छ स्वीकारला. त्यावरुनच विरोधक भाजपवर निशाणा साधत आहेत, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्यावरून मंत्रिमहोदयांवर चांगलेच तोंडसूख घेतले. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्यांनी ‘लाडके गुंड‘ म्हणत भाजपला चिमटा काढला आहे.
याप्रकरणात विजय वडेट्टीवार यांनी आपल्या X या सोशल मीडिया खात्यावर मंत्री चंद्रकांत पाटील आणि गुंड गजानन मारणे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात मारणे हा मंत्रिमहोदयांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहे.
व्हिडिओ शेअर करत त्यांनी पोस्ट मध्ये लिहिले, “कुख्यात आणि महायुती सरकारचा लाडका गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री महोदयांनी देखील पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणेला हात जोडले.’
पुण्यातील कोथरूड भागात असलेला गजानन मारणे, त्याच कोथरुड मधील आमदार चंद्रकांत पाटील. लोकप्रतिनिधी हे जनतेसाठी असतात पण परत निवडून येण्यासाठी आजच्या परिस्थितीत महायुतीला लाडके गुंड महत्वाचे आहे म्हणून सत्कार चमत्कार गुंडाकडून घेतले जात आहे. या भागातील नागरिकांना अश्या गुंडपासून संरक्षण देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना मंत्री महोदय गुंडाला ‘राजाश्रय‘ देत आहे.
भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार यांनी आणि त्यांच्या मुलाने पोलिसांची इज्जत कशी काढली हे काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्राने लाईव्ह पाहिले.
पोलिसांना धमकावण्याचा असा माज खासदार नारायण राणे आणि त्यांचा मुलगा निलेश राणे यांना कुठून आला हा प्रश्न जनतेला पडला होता. त्याचे उत्तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिले आहे.
https://twitter.com/VijayWadettiwar/status/1829003477756064016
या राज्यात पोलिसांची इज्जत राहिली नाही. मंत्री गुंडांकडून सत्कार करून घेतात, आमदार पोलिसांना शिवीगाळ करतात, धमकावतात. जिथे गुंडांना राजाश्रय मिळत आहे तिथे सामान्य जनतेने आपले रक्षण होईल या भाबड्या आशा ठेवू नये. गुंडांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या या सरकारला आता जनतेने पुष्पगुच्छ देऊन निरोप द्यावा हीच राज्यातील जनतेला विनंती.” अशा आशयाची पोस्ट करत त्यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.