Eknath Shinde : सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या घटनेवरून सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. या घटनेवरून अनेक वाद विवाद सुरू आहेत. देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया येत असतानाच आता मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कश्यामुळे कोसळला ? तो कोसळण्यामागची कारणं काय? तसेच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी तज्ज्ञ, स्थापत्य अभियंते, आयआयटी याचसोबत नौदल अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांनी आदेश दिले आहेत आणि लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्यात येईल असे सांगितले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर या सर्वांची याबाबत वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
जेजे स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महारात्ष्ट्रातील नामांकित शिल्पकार यांचा समावेश छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन पुतळा उभारण्यात असणार आहे.
दरम्यान,छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे ही अत्यंत दुःखद घटना असून भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी प्रयत्नशील राहू असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.