सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या घटनेवरून सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. अनेकांकडून या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या घटनेवरूनच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आंदोलन केले जाणार आहे.
आज हे आंदोलन राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याजवळ आणि कलेक्टर ऑफिस समोर होणार आहे. 8 महिन्यांतच पुतळा कोसळल्याने अजित पवार गटाकडून देखील संताप व्यक्त होताना दिसत आहे. या घटनेवरून अजित पवारांनी जनतेची माफी मागितली आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार जनसन्मान यात्रा करत आहेत. लातूर येथे या जनसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीच बोलताना अजित पवार यांनी जनतेची माफी मागितली आहे. महाराजांचा पुतळा कोसळणे ही अतिशय वाईट घटना असून या घटनेसाठी मी महाराष्ट्रातील 13 करोड जनतेची माफी मागतो अस वक्तव्य त्यांनी केले आहे .
दरम्यान, हा पुतळा बांधणाऱ्या शिल्पकारावर तक्रार करण्यात आली असून पुतळा कशामुळे कोसळला याचा तपास सुरू आहे.या घटनेमुळे विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. सरकारवर अनेक टीका देखील करण्यात येत आहेत.
तसेच पीडब्ल्यूडी अंतर्गत यावर तक्रार केली गेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना निकृष्ट दर्जाचे काम केले असून बांधकामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडली असे आरोप देखील करण्यात येत आहेत.