सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या घटनेवरून सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. या घटनेवरून अनेक वाद विवाद सुरू आहेत. देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अनेक नेते त्या ठिकाणी जाऊन भेट देखील घेत आहेत. या ठिकाणी आज आंदोलन देखील करण्यात येत आहे.
या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सरकारकडून सांगण्यात आले असले तरी राज्यात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील शिवप्रेमी नवीन पुतळा घेऊन या ठिकाणी पोहचले होते. जोपर्यंत शासन या ठिकाणी नवीन पुतळा बसवत नाही, तोपर्यंत आपण या ठिकाणी एखादा पुतळा बसवला पाहिजे असे या शिवप्रेमी यांचे म्हणणे होते.
परंतु प्रशासनाने शिवप्रेमींनी आणलेल्या पुतळा बसवण्यास नकार दिला आहे. त्यांची मागणी फेटाळून हा पुतळा परत पाठवण्यात आला आहे. हा पुतळा मालवण नगर परिषदेच्या आवारात धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान यांनी आणला होता. परंतु प्रशासनाने त्यांची मागणी मान्य केली नाही.
धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुटलेल्या पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत याचे आम्हाला दुःख होत आहे. ही घटना अतिशय वाईट आहे. या प्रकरणावरून राजकारण होताना दिसत आहे.
याचसोबत जोपर्यंत शासन या ठिकाणी नवीन पुतळा बसवत नाही, तोपर्यंत आपण या ठिकाणी एखादा पुतळा बसवला पाहिजे, हे आमच्या मनात आले. त्यामुळे हा पुतळा घेऊन आम्ही आलो होतो असे स्पष्टीकरण धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानकडून देण्यात आले आहे. दरम्यान, शिवप्रेमींनी आणलेला हा पुतळा बसवण्यास प्रशासनाने नकार दिला आहे.