आज रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची बहुप्रख्यात सर्वसाधारण वार्षिक सभा (एजीएम) पार पडली आहे. ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या ज्यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्षांनी एजीएममध्ये ३५ लाख भागधारकांना संबोधित करण्यास सुरुवात केली आणि शेयर बाजारातही या कंपनीच्या शेअरने उसळी मारलेली दिसून आली.
रिलायन्स आपल्या शेअरहोल्डर्सना १:१ या प्रमाणात बोनस शेअर देणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भात प्रस्ताव ठेवला जाणार आहे.येत्या ५ सप्टेंबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत बोनस शेअर्सचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या फ्री कॅश रिझर्व्हमधून हे शेअर्स देण्यात येणार आहेत. कंपनीनं गुरुवारी शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे. त्यानुसार, प्रत्येक शेअरमागे आरआयएलचा एक अतिरिक्त शेअर गुंतवणूकदारांना देण्यात येणार आहे.
या बोनस शेअरच्या घोषणेनंतर आज दिवसभरात रिलायन्सचा शेअर १.५५ टक्क्यांनी वधारून ३०४२.९० रुपयांवर पोहोचला. रिलायन्सने यापूर्वी २०१७ आणि २००९ मध्ये अंदाजे १:१ या दराने बोनस शेअर्स दिले होते. कंपनीच्या शेअर्समध्ये आज झालेल्या तेजीनंतर हा शेअर ८ जुलै २०२४ च्या ३२१७.९० रुपयांच्या उच्चांकी पातळीपासून ४ टक्क्यांनी दूर असल्याचे दिसून आले आहे.
बोनस शेअर म्हणजे काय ?
कंपनीकडून आपल्या विद्यमान शेअरहोल्डर्सना मोफत दिल्या जाणाऱ्या शेअर्सना बोनस शेअर्स असे म्हणले जाते. . या शेअरसाठी गुंतवणूकदारांना पैसे मोजावे लागत नाहीत. हे शेअर देताना कंपनी एक रेश्यो (गुणोत्तर) जाहीर करते. . उदा. १:१, १:२ अशा वेगवेगळ्या प्रमाणात हे शेअर दिले जातात. शेअरहोल्डरकडे आधीपासून असलेल्या संख्येनुसार त्याला बोनस शेअर दिले जातात.
तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेलने आपल्या १५ वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज खास भेट दिली आहे. कंपनीने या अधिकाऱ्यांना ३५१ कोटी रुपयांचे शेअर वितरीत केले आहेत.