Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपी ब्रिजभूषण सिंह यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. ब्रिज भूषण यांनी आपल्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर, आरोपपत्र आणि कनिष्ठ न्यायालयाने आरोप निश्चित करण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र, सध्या त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही.
याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्या याचिकेच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ सप्टेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे. या प्रकरणात आरोप निश्चित झाल्यानंतर ते न्यायालयात का आले, असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने ब्रिजभूषण यांना केला. असे म्हणत त्यांची याचिका फेटाळण्यात आली.
ब्रिजभूषण यांच्या वकिलाचा आरोप
ब्रिजभूषण यांच्या वकिलाने सांगितले की, या प्रकरणात सहा तक्रारदार आहेत, एफआयआर दाखल करण्यामागे छुपा अजेंडा आहे. वकिलाने सांगितले की, सर्व घटना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत. हे फक्त एक षडयंत्र आहे. मात्र, वकिलांचा युक्तिवाद न्यायालयात चालला नाही आणि त्यांच्याविरुद्धची सुनावणी सुरूच राहणार आहे.
काय प्रकरण आहे?
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांसारख्या कुस्तीपटूंच्या नेतृत्वाखाली देशातील 30 कुस्तीपटू भारतीय कुस्ती संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात संपावर बसले होते. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर कुस्ती संघटना मनमानी पद्धतीने चालवल्याचा आणि महिला कुस्तीपटू आणि महिला प्रशिक्षकांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. या प्रकरणात ऑलिम्पिक असोसिएशनच्या समितीने तपास केला, परंतु त्यांचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला नाही. अशा स्थितीत जूनमध्ये कुस्तीपटू पुन्हा संपावर बसले. या काळात बराच गोंधळ सुरु राहिला. यावेळी पोलिस आणि कुस्तीपटूंनमध्ये झटापटही झाली. शेवटी कुस्तीपटूंनी आपली सगळी पदके परत केली. यानंतर ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल झाला नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रकरणी अद्याप सुनावणी सुरू आहे. ब्रिजभूषण यांचा कार्यकाळ गेल्या वर्षीच संपला होता. अशा स्थितीत त्यांनी कुस्ती संघटनेतून माघार घेतली आहे.