आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर सर्व पक्षांनी आपली कंबर कसली आहे, अशातच आता काँग्रेसने एक नवीन योजना जाहीर केली आहे, ज्याअंतर्गत महिलांना 8 हजार रुपये महिना दिले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सध्या राज्यात महायुती सरकारची लाडकी बहीण योजना चालवली जात आहे, ही योजना चांगलीच रंगली असून, सरकार या योजनेंतर्गत महिलांना दरमहिना 1500 रुपये देत आहे. अशातच आता काँग्रेसकडून महालक्ष्मी योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज गुरुवारी काँग्रेसच्यावतीने नागपूर मधील संविधान चौकात मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी महायुती तसेच भाजप सरकार जोरदार हल्ला चढवून काँग्रेसने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
या आंदोलनात महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार यांच्यासह शहरातील सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते.
यावेळी अलका लांबा यांनी अनेक मुद्द्यावर भाषण केले. तसेच महायुतीच्या लाडकी बहीण योजनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महालक्ष्मी योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा 8 हजार रुपये दिले जाणार असल्याची घोषणा लांबा यांनी केली.
“राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास महिलांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात येईल. त्यांच्यासाठी महालक्ष्मी योजना जाहीर करून महिन्याला प्रत्येक आठ हजार रुपये दिले जातील.” असं त्या म्हणाल्या आहेत.