Eknath Shinde : सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या घटनेवरून विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे.
राज्यभरातून या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत, अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, माफी मागितली आणि विरोधकांवर देखील निशाणा साधला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “शिवरायांच्या चरणी एकदा नाही शंभरवेळा डोकं ठेवायला मी तयार आहे.”
पुढे बोलताना म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हा काही राजकारणाचा विषय नाही, विरोधकांनी यावर राजकारण करू नये. अनेक विषय आहेत राजकारण करायला. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा आहे, अस्मिता आहे. आपलं दैवत आहे, यावर राजकारण करू नये. जर ते माफीची मागणी करत आहेत, तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आणि आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. त्यांच्या चरणांवर त्यांच्या पायावर एकदा नाही शंभरवेळा डोकं ठेवायला मी तयार आहे. शंभरवेळा त्यांची माफी मागायला मला कुठलाही कमीपणा वाटणार नाही. कारण, छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत.
त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतो आहोत. त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. पुढे ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांना देखील सुबुद्धी द्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार असा पुतळा लवकरात लवकर कसा उभा राहील, यासाठी विरोधकांनी देखील सहकार्य केलं पाहीजे. असंही यावेळी ते म्हणाले.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेवून, जाहीर माफी मागितली आहे.