राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काही दिवसांपूर्वी कोसळला. मात्र विरोधकांनी यावर राजकारण करणे दुर्दैवी आहे. माफीची मागणी जर ते करत असतील तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या महाराजांच्या पायावर मी १०० वेळा माफी मागायला मला काहीही वाटणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील याबाबत विरोधकांनी राजकारण करू नये असे म्हणत माफी मागितली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, पुतळा दुर्घटनेबाबत मी छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागतो. सिंधुदुर्गमधील पुतळा दुर्घटनेबाबत काल रात्री एक महत्त्वाची बैठक झाली. ही खरतर खूप वेदनादायी घटना आहे. नौदलाने महाराजांचा पुतळा बनवला होता. या संदर्भात झालेल्या बैठकीत सरकारमधील मंत्री, तसेच नौदलाचे अधिकारी आणि पोलीस सुद्धा उपस्थित होते. कालच्या बैठकीनंतर एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये नौदलाचे अधिकारी, तज्ज्ञ शिल्पकार आणि इतर विषयातील तज्ज्ञ यांचा समावेश करण्यात आला आहे. पुतळा ज्या ठिकाणी उभा होता तिथले वारे, वातावरण आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेऊन महाराजांचा नवीन मजबूत पुतळा उभा करण्यात येणार आहे, असेही शिंदे यांनी सांगितले आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे. नौदलानं चांगल्या भावनेने तो उभारला होता. विरोधकांनी यावर राजकारण करणे दुर्दैवी. माफीची मागणी जर ते करत असतील तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या महाराजांच्या पायावर मी १०० वेळा माफी मागायला मला याचे काहीही वाटणार नाही, असेही मुख्यंमत्री यावेळी म्हणाले आहेत .
अजित पवारांनी तर यावर माफी सुद्धा मागितली आहे. पण महत्त्वाचे म्हणजे शिवाजी महाराज आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाहीत. विरोधकांनी सुद्धा यावर राजकारण करू नये. नौदलानं दुर्घटनास्थळाची पाहणी केली आहे. तो परिसर सुरक्षित करावा याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पहाणी करून पुतळा उभारण्याबाबत आम्हाला काम करायचे आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे उप मुख्यमंत्री म्हणाले आहेत.