महाराष्ट्रात आजपासून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पुणे, सातारा, जळगाव, अहमदनगर येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांत आज मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे तसेच कोकणातील रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली असून या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात आजपासून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
देशातही सध्या काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पुराने थैमान घातले आहे. पाऊस सध्या कमी झाला असला तरी बडोदा येथे पुरस्थिती कायम आहे. वडोदरा शहरात देखील पुरपरिस्थिती कायम आहे.