Narendra Modi : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुंबई पालघरमध्ये त्यांच्या हस्ते 76,000 कोटी रुपयांच्या वाधवन बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. यासोबतच ते मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 लाही संबोधित करणार आहेत. तसेच 1,560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्यपालन प्रकल्पांचे उद्घाटन देखील करतील. यामुळे देशाचा व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, “पंतप्रधान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) 2024 ला संबोधित करतील. यानंतर दुपारी दीड वाजता ते पालघर येथील सिडको मैदानावर विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करतील. यापैकी वाधवन बंदराचा भूमिपूजनचा कार्यक्रम प्रमुख आहे. जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार उभारणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ असलेले वाधवन बंदर हे भारतातील सर्वात मोठ्या खोल जल बंदरांपैकी एक असेल आणि आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. हे बंदर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी देखील सुसज्ज असेल. पंतप्रधान सुमारे 360 कोटी रुपये खर्चून मासेमारी जहाजांसाठी एक कम्युनिकेशन सपोर्ट सिस्टीम लॉन्च करतील.
या प्रकल्पांतर्गत 13 किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये टप्प्याटप्प्याने यांत्रिकी आणि मोटार चालवलेल्या मासेमारी नौकांवर एक लाख ट्रान्सपॉन्डर बसवले जातील.
पंतप्रधान मोदींचे ट्विट
पीएम मोदींनीही ट्विट करून महाराष्ट्र दौऱ्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट केले, “मी 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील लोकांमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे. मी मुंबई आणि पालघरमधील कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. मुंबईत, मी सकाळी 11 वाजता ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 मध्ये सहभागी होणार आहे.”
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यानिमित्त सर्वत्र मोठा पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. तब्बल 5 हजार पोलिस आज रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहेत. त्यासोबतच या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांसह राज्यातील अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.