Modi in Mumbai : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच महाराष्ट्रातले राजकारण तापले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पालघरमध्ये सुमारे ७६,००० कोटी रुपयांच्या वाधवन बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. मात्र त्यांच्या आगमनापूर्वीच मुंबई आणि पालघरमध्ये पंतप्रधानांना विरोध सुरू झाला आहे.
सिंधुदुर्गात शिवरायांचा भव्य पुतळा कोसळ्यानंतर काही दिवसांनी त्यांचा दौरा होत असून, या घटनेचा मुंबईत काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याला काँग्रेसचा कडाडून विरोध होत आहे.
यातच काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी बीकेसीमध्ये पीएम मोदींच्या कार्यक्रमस्थळी आंदोलन करण्याची घोषणा केली होती. आम्ही बीकेसीला जाऊन पंतप्रधानांना भेटू आणि त्यांना प्रश्न विचारु की अशातऱ्हेने निकृष्ठ दर्जाचे काम झालेलं आहे त्याची चौकशी होणार आहे की नाही? आणि ते जाहीर माफी मागणार आहेत की नाही? असे वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या. अशा परिस्थितीत आज त्यांच्या घराबाहेर अन् परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यांना घराबाहेर पडू न देण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
दरम्यान पोलिसांनी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांना पोलिसांनी अटक केली. तर काँग्रेस नेते नसीम खान यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला आहे, याच्या निषेधार्थ मुंबईसह अनेक भागात पंतप्रधान मोदींच्या माफीचे पोस्टर्सही लावण्यात आले आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागावी अशी मागणी होत आहे.